

पुणे: जय जगत सामाजिक संस्था आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आमची पिढी, आमची कविता’ हे कवी संमेलन पुण्यात प्रचंड उत्साहात पार पडले. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी या भव्य काव्यमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही… या ओळींचा प्रत्यय आणून देत तरुण कवींनी कार्यक्रमात बहार आणली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पांडुरंग कंद यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करत तरुण कवींना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तर प्रसिद्ध विचारवंत लेषपाल जवळगे यांनी आजच्या कवितेबद्दल आणि कवींबाबत आपली भूमिका अत्यंत परखडपणे मांडली. कवींचा संघर्ष आणि त्यांची भाषा कवितेच्या माध्यमातून कशी व्यक्त होत आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात विशेष प्रकाश टाकला.
या संमेलनात महाराष्ट्रभरातून आलेल्या नामवंत आणि आश्वासक तरुण कवींनी आपल्या बहारदार व दर्जेदार रचना सादर केल्या. यामध्ये कवी श्री. सागर काकडे, श्री. विशाल उशिरे, डॉ. स्वप्निल चौधरी, श्री. निखिल सुक्रे, कु. भाग्यलक्ष्मी क्षीरसागर, श्री. विशाल खोंदले या कवींचा समावेश होता.
या तरुण शिलेदारांनी सामाजिक जाणिवा, वर्तमानातील विसंगती, प्रेम आणि आजच्या पिढीचे प्रश्न आपल्या कवितांमधून अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या धारदार आणि संवेदनशील रचनांना उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
या संमेलनात कवी निखिल सुक्रे यांनी सादर केलेल्या कवितेने श्रोत्यांच्या डोळ्यांत अंजन घातले. सध्या समाजात मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या अत्यंत संवेदनशील विषयावर त्यांनी आपली कविता सादर केली.
तुम्ही जर या समाजाचा भाग आहात, तर त्यावर बोलणे हे आपले कर्तव्यच आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक कवीने आणि सुजाण नागरिकाने अशा विषयांवर बोलते झाले पाहिजे, असे परखड मत कवी निखिल सुक्रे यांनी यावेळी मांडले. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
या संपूर्ण कवी संमेलनाचे बहारदार आणि नेटके सूत्रसंचालन श्री. अपूर्व राजपूत यांनी केले. त्यांच्या खुसखुशीत, अभ्यासपूर्ण आणि काव्यमय शैलीमुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. जय जगतचे प्रवीण शिंदे आणि लेशपाल जवळगे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी प्रयत्न केले.
