पुण्यात मोशी येथे १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य ‘ग्लोबल मराठा बिझिनेस एक्स्पो 2026’

पुणे | प्रतिनिधी : मराठा सेवा संघ गेल्या ३२ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक क्षेत्रात कार्यरत असून, आता मराठा समाजातील युवक, शेतकरी, महिला आणि नवउद्योजकांना उद्योग-व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, पुणे जिल्हा यांच्या वतीने ‘बिझनेस ग्रोथ अँड अपॉर्च्युनिटी कॉन्कलेव २०२६’चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष संजय वायाळ, अध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष राजेंद्र पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर, रामदास काकडे, शरद काळे, अविनाश जोगदंड, विजय सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उद्योजक उपस्थित होते. पुण्यासह अनेक जिल्ह्यांतील मराठा उद्योजक, महिला उद्योजक, व्यावसायिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विशाल देसले सर यांनी नव्या व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क मिळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. बिल्डर, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर तसेच विविध क्षेत्रांतील उद्योजकांनी एकत्र येऊन परस्परांना व्यवसायवाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ‘मोशी येथे १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान भव्य ‘ग्लोबल मराठा बिझिनेस एक्स्पो 2026’’ संदर्भातील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. या एक्स्पोमध्ये स्टॉल, पार्किंगसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, मोठ्या संख्येने मराठा उद्योजक, व्यावसायिक, महिला, स्टार्टअप्स आणि तरुण सहभागी होणार आहेत.
‘एकत्रित होणे ही काळाची गरज’ — अविनाश जोगदंड
रिमिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे अविनाश जोगदंड यांनी उद्योग क्षेत्रात मराठा समाजाने एकत्रित येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शेतकरी बांधवांनी शेतीसोबत उद्योग-व्यवसायाकडेही वळले पाहिजे. उद्योजकता वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी योगदान देण्याची आवश्यकता आहे. ब्रँड, एक्स्पोर्ट आणि आधुनिक व्यवसायाच्या संधींमध्ये मराठा उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
‘मोठी स्वप्ने पाहा, नेतृत्व आपल्यातच आहे’ — शरद रामदास काळे
Shoption प्रायव्हेट लिमिटेडचे शरद रामदास काळे म्हणाले की, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. जगातील कोणताही ब्रँड दुकानदाराशी कनेक्ट झाला पाहिजे. व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पाच मिनिटांत मिळू शकते, अशा आधुनिक वित्तीय सुविधांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा.” “लोक काय म्हणतील याचा विचार न करता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. नेतृत्व आपल्यामध्येच असले पाहिजे. जगात एखादी गोष्ट कोणी करू शकत असेल, तर ती मराठा समाजही नक्की करू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना उद्योगाशी जोडण्यावर भर — विजय सावंत
एवरा अॅग्रो सायन्सचे विजय सावंत यांनी येणाऱ्या काळात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेतकऱ्यांना उद्योगाच्या माध्यमातून कसा फायदा होईल, यासाठी काम करणे आवश्यक आहे. या उद्योग समूहाशी जोडले गेल्यानंतर कुटुंबाचा एक भाग म्हणून काम करण्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जागतिक स्तरावर मराठा एक्स्पोर्टची ओळख निर्माण करू’ — संजयजी वायाळ
ईश्वेद बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संजयजी वायाळ यांनी उद्योजकतेसाठी धाडस आणि आत्मविश्वासाची गरज असल्याचे सांगितले. खेडेकर साहेबांनी आम्हाला धाडसाने स्वतःचे काम करण्याची प्रेरणा दिली. मराठा एक्स्पोर्टला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील उद्योजकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आगामी काळ हा नेटवर्किंग, सोशल नेटवर्किंग, डिजिटल मार्केटिंग आणि जागतिक व्यवसायाचा आहे. देशात मोठ्या संख्येने मराठी समाज असून, पुढील पाच वर्षांत एक लाख उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २१ देशांशी व्यावसायिक संपर्क वाढविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या एक्स्पोमध्ये महिलांसाठी सुमारे २५० स्टॉल, स्टार्टअपसाठी स्वतंत्र संधी, स्किल व मॅनपॉवर तसेच रोजगाराशी संबंधित स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून मोठ्या संख्येने उद्योजकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
‘जग बदलले, पण आपण बदललो नाही; आता उद्योजक व्हायचे आहे!’ — पुरुषोत्तम खेडेकर
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर सर यांनी मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योजकतेकडे मोठ्या प्रमाणावर वळण्याचे आवाहन केले.ते म्हणाले, “जग बदलले, पण आपण बदललो नाही. आता मराठा संघाने उद्योजकांकडे वळले पाहिजे. मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत प्रत्येक स्तरावर उद्योगाची उभारणी झाली पाहिजे. जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करणे ही आजची गरज आहे.”
बुलढाणा जिल्ह्याने अनेक मोठे उद्योजक घडविल्याचा उल्लेख करत त्यांनी “कमवा, मोठे व्हा, एकत्र या आणि एकत्र रहा,” असा संदेश दिला. आगामी उद्योग एक्स्पो भव्य आणि मोठ्या स्वरूपाचा होईल. भविष्यात वर्षातून दोन-तीन वेळा अशा प्रकारचे उद्योग एक्स्पो आयोजित करून मराठा समाजातील नव्या पिढीला उद्योगाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आता केवळ चर्चा नको, तर मोठे उद्योजक व्हायचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने व्यवसाय, उद्योग आणि उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे,” असे आवाहन पुरुषोत्तम खेडेकर सर यांनी केले.
‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्सपो 2026’ जागतिक स्तरावर नेण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. लाखो मराठा उद्योजक घडविण्याचे आमचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल,असे मुख्य आयोजक पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन खामकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास आयोजन मराठा उद्योजक कक्ष पुणे च्या टीमने केले होते.
‘ग्लोबल मराठा बिझिनेस एक्स्पो 2026’ च्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजक, शेतकरी, महिला, युवक आणि नव्या व्यावसायिकांना एकत्र आणून व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, ‘एकत्र या, व्यवसाय वाढवा आणि समाजाच्या आर्थिक विकासाला हातभार लावा’ हा संदेश या कॉन्कलेवमधून देण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणी, मुंबईचे किरण खोत सर यांनी केले.
