– श्रवण हर्डीकर यांचे प्रतिपादन; केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत एकदिवसीय ‘ग्रिहा रिजनल कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन

पुणे: “वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरणीय नियमांची प्रभावी अंमलबजावणी, नियमित देखरेख आणि शाश्वत बांधकाम पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांनी केले. शाश्वत पर्यावरणपूरक बांधकामांना प्राधान्य ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटॅट असेसमेंट (ग्रिहा), दी एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (टेरी) व नॉलेज पार्टनर सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह (एसआय) या संस्थांच्या वतीने आयोजित ‘ग्रिहा रिजनल कॉन्क्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी हर्डीकर बोलत होते. ‘कमी कार्बन उत्सर्जनाचा भविष्यकालीन मार्ग: बांधकामांपासून पायाभूत सुविधांपर्यंत’ अशी या परिषदेची संकल्पना होती.
कोरेगाव पार्क येथील हॉटेल कॉनरॅडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) संचालक डॉ. सुनील भागवत, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रसाद मोडक, ‘ग्रिहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेठ, ‘टेरी’च्या शाश्वत बांधकाम विभागाच्या संचालिका शबनम बस्सी, व्ही. के. ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक हृषीकेश कुलकर्णी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य अभियंता विवेक खरवडकर, बांधकाम व्यावसायिक सर्वेश जावडेकर, आर्कि. अनुजा पंडित, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हच्या विश्वस्त अनघा परांजपे-पुरोहित, विजय साने, उपेंद्र देशपांडे, डी. वाय. पाटील महाविद्यालयातील प्रा. दिनेश झोपे, विश्वकर्मा विद्यापीठातील स्कुल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंगच्या अधिष्ठाता डॉ. प्रीती धनवट आदी उपस्थित होते. यावेळी ‘ग्रिहा’ने विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे व डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला.
श्रवण हर्डीकर म्हणाले, “शाश्वत विकास हवा असेल, तर प्रत्येकाने पुढाकार घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणपूरक बांधकाम न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी. शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने धुळीचे प्रमाण वाढलेले दिसते, त्यावर नियंत्रण येण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.”
डॉ. सुनील भागवत म्हणाले, “शाश्वततेच्या दृष्टीने येत्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकतो. शाश्वतता महत्वाची आहेच; पण अर्थशास्त्र आणि मानवी गरजा हे त्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक व शाश्वत विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याची गरज आहे.”
संजय शेठ म्हणाले, “झपाट्याने विकसित होत असलेल्या पुणे शहरात पायाभूत सुविधाही गरजेच्या आहेत. मात्र या सुविधा उभारताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाश्वत व पर्यावरणपूरक बांधकामांसाठी सर्व घटकांनी पुढाकार घेऊन एकत्रितपणे काम करावे. त्यासाठी ही परिषद नक्कीच मार्गदर्शक ठरेल.”

प्रारंभी डॉ. प्रसाद मोडक व अनघा परांजपे-पुरोहित यांनी शाश्वत विकासासाठी पर्यावरणीय मंजुरी व कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ‘ग्रिहा रेटिंग’ मिळालेल्या प्रकल्प आणि शाळांना विशेष सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने ‘ग्रिहा’च्या शिष्टमंडळाने पुण्यातील ‘सारथी’ या हरित इमारतीला भेट देत पाहणी केली.
‘शाश्वततेचा विस्तार: हरित इमारतींपासून ते अनुकूल शहरे आणि पायाभूत सुविधांपर्यंत’ आणि ‘कमी-कार्बन संक्रमणासाठी वित्तपुरवठा: व्यावसायिक रणनीतीपासून ते कार्बन मूल्यापर्यंत’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांनी विचार मांडले. अदिती देव यांनी सूत्रसंचालन केले. शबनम बस्सी यांनी आभार मानले
