

पुणे : प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक यांच्या मातोश्री शीला रत्नाकार फाटक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सेवाकार्यात स्वत:ला वाहून घेतलेल्या सुमित आणि अमित पवार यांच्या मातोश्री सीमा सुभाष पवार यांना जागतिक महिला दिनानिमित्त तपस्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कला, साहित्य आणि सामाजिक कार्यात नावलौकिक मिळविलेल्या व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या तसेच कला-साहित्य-सामाजिक कार्यात लक्षणीय कर्तृत्व गाजविणाऱ्या प्रसिद्धी पराङ्मुख स्त्रीशक्तीला महिला दिनानिमित्त स्वानंदी क्रिएशन पुणे आणि केळकर गंगोत्री डेव्हलपर्सतर्फे ‘तपस्या पुरस्काराने’ दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती स्वानंदी क्रिएशनच्या संस्थापक, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आणि केळकर गंगोत्री डेव्हलपर्सचे संचालक मकरंद केळकर यांनी आज (दि. २५) पत्रकार परिषदेत दिली. पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि हिंदीच्या गाढ्या अभ्यासक प्रा. डॉ. शुभदा सुधीर मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस ‘लयाकृती’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. अथर्व कुलकर्णी संवादिनी साथ करणार आहेत.
निखिल फाटक हे प्रख्यात भारतीय तबला वादक आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील एकल वादन आणि साथसंगत या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कौशल्यासाठी ते विशेष ओळखले जातात. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर तबला वादन केले. त्यानंतर शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकाविले आहेत.
सुमित पवार हे सीमा पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र असून लहानपणापासून संघ स्वयंसेवक आहेत. २०१६ ते २०१९ या कालावधीत ते कोल्हापूर जिल्ह्यात प्रचारक म्हणून कार्यरत होते. सध्या ते खासगी कंपनीत नोकरी करीत असून वडगाव नगर सहकार्यवाह आहेत. तसेच अमित पवार हेही संघ स्वयंसेवक आहेत. जनता सहकारी बँकेत ते नोकरी करीत असून वडगाव नगर शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून जबाबदारी पाहात आहेत.
