*नुकतेच उद्घाटन झालेले स्वयंपाकघर ‘पीएम पोषण’ उपक्रमाचा भाग असून, पुण्याच्या २९ शाळांमधील २५,००० मुलांना पौष्टिक माध्यान्ह भोजन पुरविणार*

पुणे, ७ एप्रिल २०२६*: बालकांचे पोषण आणि शिक्षणाप्रती असलेली आपली सामूहिक वचनबद्धता आणखी दृढ करताना डॉएच्च बँकेने (Deutsche Bank) भारतात त्यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘अक्षय पात्रा फाउंडेशन’ सोबत भागीदारी केली आहे. अक्षय पात्रा फाउंडेशन भारत सरकारच्या ‘पीएम पोषण’ योजनेची अंमलबजावणी करणारी सामाजिक संस्था आहे. या भागीदारी अंतर्गत आज पुण्याच्या शिवाजीनगर भागात अत्याधुनिक मध्यवर्ती स्वयंपाकघराचे (सेंट्रल किचन) उद्घाटन करण्यात आले.
डॉएच्च बँक ग्रुप (भारत आणि इमर्जिंग एशिया) चे सीईओ श्री. कौशिक शपारिया आणि डॉएच्च बँकेच्या कॉर्पोरेट अफेअर्स अँड स्ट्रॅटेजी विभागाचे ग्लोबल हेड श्री. बेंजामिन अल्का यांच्या हस्ते या स्वयंकघराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अक्षय पात्रा फाउंडेशनचे सीईओ श्री. श्रीधर व्यंकट, राष्ट्रीय अध्यक्ष श्री. भरतर्षभ (Bharatarshabha) दास आणि पुणे विभागाचे प्रादेशिक अध्यक्ष श्री. संपाती दास हे मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील २९ सरकारी आणि अनुदानित शाळांमधील २५,००० मुलांना गरम, पौष्टिक आणि सकस आहार देण्याच्या उद्देशाने या मध्यवर्ती स्वयंपाकघराची रचना करण्यात आलेली आहे. शाळेलगतच्या परिसरातील मुलांची शालेय उपस्थिती वाढवण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना अधिकाधिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यात हे स्वयंपाकघर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सदर केंद्राच्या उभारणीतून पुण्यातील शालेय पोषण आहार व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. तब्बल २०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे स्वयंपाकघर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि कार्यक्षमता आदी उच्च मानकांनुसार साकारण्यात आलेले आले आहे. या केंद्राभोवतालच्या २० किलोमीटर परिसरातील शाळांमध्ये भोजन पुरविले जाणार आहे. भोजन पुरवठ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार आहे. यातून सामाजिक प्रभावासोबतच पर्यावरणाप्रतीची वचनबद्धतासुध्दा अधोरेखित झाली आहे.
याप्रसंगी बोलताना डॉएच्च बँक ग्रुप (भारत आणि इमर्जिंग एशिया) चे सीईओ श्री. कौशिक शपारिया म्हणाले: “मानवी संसाधनांमध्ये केलेली गुंतवणूक हीच सर्वात चिरस्थायी गुंतवणूक असते, ही डॉएच्च बँकेची मनोधारणा आहे. पुण्यातील या स्वयंपाकघराचे उद्घाटन हे ‘अक्षय पात्रा ‘सोबतच्या आमच्या घट्ट आणि मजबूत अशा भागीदारीचे प्रतीक होय. पुरेशा अन्नाअभावी कोणत्याही मुलाचे शिक्षण थांबू नये, ही आमची सामायिक धारणा आहे. भारताचे भविष्य आज शाळाशाळांमधील वर्गांमध्ये फुलत असताना, पुण्यातील अधिकाधिक मुलांना त्यांच्या हक्काचे पोषण आणि शिक्षण मिळावे, ही आमची वचनबद्धता या स्वयंपाकघरातून दिसून येते. अक्षय पात्रा सोबतच्या आमच्या भागीदारीने आता तब्बल १० कोटी व्यक्तींना अन्न पुरविण्याचा टप्पा ओलांडला, याचा मला विशेष आनंद होतोय.”
अक्षय पात्रा फाउंडेशनचे सीईओ श्रीधर व्यंकट म्हणाले, “आम्ही उभारलेले प्रत्येक स्वयंपाकघर हे मुलांसाठी, त्यांच्या वर्गासाठी आणि पर्यायाने राष्ट्राप्रती एक वचनबद्धता आहे. ‘पीएम पोषण’ चौकटींतर्गत अतिशय सक्षम सार्वजनिक-खासगी भागीदारी काय साध्य करू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुण्याचे हे केंद्र होय. डॉएच्च बँकेने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल आणि भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत.”
पुण्यातील या स्वयंपाकघराचा शुभारंभ हा संपूर्ण भारतात उच्च-प्रभाव असलेल्या पोषण उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी अक्षय पात्रा फाउंडेशन करत असलेल्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे केंद्र सुदृढ आणि सुशिक्षित राष्ट्र घडवण्याच्या सामायिक दृष्टिकोनाला अधिक बळकट करते. तसेच, बालकांचे पोषण आणि शिक्षणामध्ये सातत्यपूर्ण गुंतवणूक करून ‘विकसित भारत’ हे व्यापक ध्येय गाठण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल होय.
डॉएच्च बँक आणि अक्षय पात्रा यांच्यातील भागीदारी २०१४ पासून सुरु झालेली आहे आणि भुकेमुळे कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, या विश्वासावर ही भागीदारी आधारलेली आहे. गेल्या दशकात, बँकेने गांधीनगर, जयपूर, बेंगळुरू आणि पुणे येथील सुमारे पाच लाख मुलांना माध्यान्ह भोजन पुरवण्यास मदत केलेली आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतकार्यही केले आहे. या भागीदारीतील एक ऐतिहासिक क्षण म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये डॉएच्च बँकेने १० कोटी (१०० दशलक्ष) व्यक्तींना जेवण देण्याचा टप्पा ओलांडला आणि या विलक्षण क्षणाचे औचित्य साधताना जयपूरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजनसुध्दा करण्यात आले होते.
