
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून गुणवरे (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास’ ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सामाजिक उपक्रमात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, गरजू रुग्णांना अल्पदरात चष्मे व मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
भैरवनाथ वि.वि. कार्यकारी सह. सेवा संस्था, गुणवरे येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महामानवांच्या विचारांचा वारसा जपत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरातील ठळक वैशिष्ट्ये:
- नेत्र तपासणी: शिबिरात शेकडो रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल नेत्र तपासणी करण्यात आली.
- अल्पदरात चष्मे वाटप: तपासणीनंतर ५७ लाभार्थ्यांना अत्यंत अल्प दरात चष्मयांचे वाटप करण्यात आले.
- मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया: तपासणी दरम्यान मोतिबिंदू आढळलेल्या०९ रुग्णांची निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर,पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
सहकार्य व आयोजन:
हे शिबिर एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय (हडपसर,पुणे ), डॉ. सोनाली बुद्धभूषण आढाव आणि साक्षी ऑप्टिकल्स (फलटण) यांच्या विशेष सहकार्याने पार पडले. या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक बुद्धभूषण अरविंद आढाव, तथागत चॅरिटेबल ट्रस्ट गुणवरे यांचे परिसरात कौतुक होत आहे.

