* केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांचे मत; आर्यन्स ग्रुपतर्फे ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’, तंत्रज्ञान व नवकल्पना राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पुणे, ता. ८: “युवा पिढीची ऊर्जा, नवकल्पना यांतून विज्ञान-तंत्रज्ञान आणि हरित उर्जेच्या क्षेत्रात देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करीत आहे. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि नवकल्पनांचे विश्व देशाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणावे,” असे मत केंद्रीय कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे यांनी व्यक्त केले. विकासामुळे नागरिकांचे स्वास्थ्य अबाधित राहते व तीच स्वस्थ मानसिकता देशाला प्रगतीकडे अधिक वेगाने घेऊन जाणारी ठरेल, असेही ते म्हणाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, उद्योग आणि नवकल्पनांचा संगम घडवून आणणाऱ्या ‘एडब्ल्यूटीआयएस २०२६’, या तंत्रज्ञान व नवकल्पनाविषयक तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दुबे बोलत होते. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजतर्फे आयोजित या परिषदेचे उद्घाटन हिंजवडी येथील हॉटेल विवांता येथे झाले. हरित उर्जा व जैवइंधन क्षेत्रातील तज्ज्ञ पद्मभूषण डाॅ. ज्येष्ठराज जोशी, हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. रमण वेदराजन, ‘इस्रो’चे उपसंचालक नवलकिशोर गुप्ता, आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष मुकुंद जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप, सहकार्यकारी अध्यक्ष स्मिता शितोळे-जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सतीशचंद्र दुबे म्हणाले, “विविध क्षेत्रांत देश आत्मनिर्भर कसा होईल, याचा विचार आणि कृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे. २०४७ मधील विकसित भारत या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी केंद्र सरकार प्रयत्नरत आहे. ‘मेक इन इंडिया’ अभियानामार्फत हे उद्दिष्ट गाठण्याचे प्रयत्न सर्व क्षेत्रांत सुरू आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती वेगाने होत असून, सुईपासून जहाजबांधणी आणि सेमी कंडक्टर्स व अत्याधुनिक बॅटरीच्या निर्मितीपर्यंत आपला देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. शहर आणि गाव, यांच्यातील आधीचे अंतर, दुरावा आता संपत चालला असून, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेमुळे नागरी सुविधांचा विस्तार होत आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण भारतीय बनावटीच्या निर्यातक्षम उत्पादनांची श्रेणी विस्तारण्यासाठी युवा पिढीने आपली बुद्धीमत्ता, उत्साह आणि नवकल्पनांचे योगदान संशोधन व निर्मितीसाठी द्यावे.”

डाॅ. ज्येष्ठराज जोशी यांनी हरित ऊर्जा तसेच जैवइंधन या विषयावर मार्गदर्शन केले. रिॲक्टर्सची निर्मिती जर आपण देशात केली, तर प्रत्येक रिॲक्टरमागे आपण १०० कोटी रुपये वाचवू शकतो. आयात केलेला एक रिॲक्टर १३५ कोटी रुपयांना पडतो. त्यामुळे या क्षेत्रातील मूलभूत गुंतवणुकीचा सकारात्मक विचार आणि कृती आवश्यक आहे. देशात लिक्विड, घन आणि वायू स्वरुपात जो बायोमास निर्माण होतो, तो ऊर्जेचा महाप्रचंड स्रोत आहे. जमिनीची मशागत आणि कस वाढवण्यासाठीही बायोमासचा वापर शक्य आहे. प्रयोगशाळांमध्ये सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता प्रत्यक्ष व्यवहारात हे संशोधन वापरात आणण्यासाठी यंत्रणा गरजेची आहे. या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत, पण आपण नवकल्पना राबविण्यात कमी पडत आहोत. त्यासाठी पारंपरिक मानसिकता बदलली पाहिजे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखण साहू यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचा विकास, आधुनिकीकरण आणि नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठीही प्रभावीपणे करणे आवश्यक आहे. त्याचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, सेवा-सुविधांमध्ये सुधारणा आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे साहू यांनी नमूद केले.
नवलकिशोर गुप्ता म्हणाले, खासगी क्षेत्रातील कंपनीने हरित उर्जा आणि जैवइंधनासारख्या घटकांना मध्यवर्ती ठेवून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे, दूरदृष्टीचे आणि कौतुकास्पद आहे. हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर ही काळाची गरज आहे. विशेषतः अंतराळ विज्ञान क्षेत्रात हायड्रोजन इंधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोठ्या क्षमतेच्या राॅकेट प्रक्षेपणासाठी लागणारी महाप्रचंड इंधनऊर्जा हायड्रोजन पूर्ण करू शकतो. एकूणच उर्जेच्या वाढत्या गरजा आणि वापर, यांच्यात ताळमेळ साधण्यासाठी हायड्रोजन इंधनावरील संशोशन, तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष वापर, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
डॉ. रमण वेदराजन यांनीही हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित होण्याची गरज अधोरेखित केली. मनोहर जगताप यांनी स्वागतपर प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील हेतू सांगितला. परिषदेची आखणी चार टप्प्यात केली आहे. पुण्यात दोन सत्रे होणार असून, दिल्ली आणि गुजरात येथे पुढील सत्रे आयोजित केली जाणार आहेत. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया, या अभियांनामार्फत आर्यन्स ग्रुपच्या विविध प्रकल्प, उत्पादने व नवकल्पनांचे सादरीकरण या परिषदेत होत आहे, असे ते म्हणाले.
उद्घाटनानंतर दुबे यांनी आर्यन्स ग्रुपतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या विविध उत्पादनांची पाहणी करून माहिती घेतली. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.
