*अंकुरा हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार; तीन वर्षीय बालकाची थक्क करणारी पुनर्प्राप्ती*

पुणे :* धैर्य, जिद्द आणि तज्ज्ञांचे कौशल्य याचे प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या एका घटनेत, जवळपास ६० टक्के भाजलेल्या आणि हृदयाचे ठोके थांबलेल्या (कार्डियाक अरेस्ट) तीन वर्षाच्या चिमुकल्यावर पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन येथे यशस्वी उपचार करण्यात आले. डॉ. मिलिंद जंबगी (बाल अतिदक्षता विभाग प्रमुख ) आणि प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील टिमच्या यशस्वी प्रयत्नांमुळे गंभीर रित्या भाजल्यामुळे जीवघेण्या परिस्थितित असलेल्या मुलाने यशस्वीपणे मात केली. ४० दिवसांहून अधिक काळ चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर अखेर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.
*थेरगाव येथे राहणारा तीन वर्षीय हरीश (नाव बदललेले)* याच्यासाठी २८ मार्च २०२६ हा एक दुर्दैवी दिवस ठरला. घरात खेळत असताना वडिलांनी त्यांच्या चाट सेंटरसाठी तयार केलेल्या गरम चिंचेच्या रसाच्या भांड्यात तो पडला. या अपघातात त्याची छाती, पाठ, पोट, चेहरा, मान, हात, पाय तसेच जननेंद्रिय आणि नितंबाचा भाग गंभीररीत्या भाजला गेला. त्याच्या शरीराच्या सुमारे ५५ ते ६० टक्के भागाला भाजलाच्या जखमा झाल्या.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि त्याला कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर प्रगत बाल अतिदक्षता उपचारांची गरज ओळखून त्याला तातडीने अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताना या बाल रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटर सपोर्टवर सतत निरीक्षणाखाली ठेवण्याची तसेच आपत्कालीन उपचार आणि अतिदक्षता व्यवस्थापनाची आवश्यकता होती. भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमा आणि कार्डियाक अरेस्टनंतर झालेल्या जटिलते मुळे रक्तदाबातील चढ-उतार आणि श्वसन निकामी होण्याचा धोका निर्माण झाला.
*अंकुरा हॉस्पिटलचे पीआयसीयू व बाल आपत्कालीन सेवा विभागप्रमुख तसेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह अँड क्रिटिकल केअर सोसायटीज, जिनिव्हा या संघटनेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जंबगी म्हणाले,* या बालकाच्या शरीराच्या जवळपास ६० टक्के भाग गंभीररित्या भाजला होता आणि आमच्याकडे येण्यापूर्वी त्याला कार्डियाक अरेस्ट देखील झाला होता. अशा प्रकारच्या गंभीर भाजण्यांमुळे अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो तसेच शरीरामध्ये संसर्ग, शॉक, श्वसनाच्या समस्या आणि दीर्घकालीन अपंगत्वाचा धोका वाढतो. आमचे पहिले उद्दिष्ट हे त्याची प्रकृती स्थिर करणे, अवयवांचे कार्य सुरळीत ठेवणे, रुग्णाच्या वेदना कमी करणे, संसर्ग रोखणे आणि जखमेचे व्यवस्थापन करणे हे होते.
*त्यांनी पुढे सांगितले की,* उपचारांमध्ये श्वसनासाठी विशेष सपोर्ट, संसर्ग नियंत्रणासाठी आयसीयू मधील विशेष उपाययोजना, रुग्णाचे योग्य पोषण, वारंवार ड्रेसिंग, कोलाजेन ड्रेसिंग, डिब्रायडमेंट प्रक्रिया आणि पुनर्वसन यांचा समावेश होता. रुग्णालयात दीर्घकाळ सुरू असलेल्या या उपचारादरम्यान वैद्यकीय टिमने चोवीस तास त्याच्या प्रकृतीचे निरीक्षण केले.
*डॉ. जंबगी म्हणाले,* “गंभीरपणे भाजलेल्या बालकांमध्ये केवळ जखमांवर उपचार करणे पुरेसे नसते. भाजल्यामुळे शरीरात काही टॉक्सिन्स (द्रव्य) निर्माण होऊन अनेक अवयव निकामी होण्याचा धोका वाढतो. योग्य पोषण, गरज पडल्यास श्वसनासाठी योग्य वेळी सपोर्ट, जखमांचे व्यवस्थापन आणि पुनर्वसन हे या उपचारांचे महत्त्वाचे घटक आहेत. कार्डियाक अरेस्टनंतर शॉक आणि श्वसन निकामी होण्यासारख्या अडचणी निर्माण झाल्या असतानाही या चिमुकल्या बाल रुग्णाने जिद्दीने लढा दिला. आमच्या टिमच्या प्रयत्नांमुळे रुग्णाच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत गेली.”
*प्लास्टिक सर्जन डॉ. श्रीकांत पिंगळे म्हणाले,* या संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान या बाल रुग्णाला एकदाही संसर्ग झाला नाही, ही सर्वात उल्लेखनीय बाब होती. जखमेचे अचुक व्यवस्थापन, ड्रेसिंग आणि पीआयसीयूमध्ये देण्यात आलेल्या उत्तमोत्तम उपचारांमुळे हे शक्य झाले.
४० दिवसांहून अधिक काळ उपचार घेतल्यानंतर या बाल रुग्णाच्या जखमा चांगल्या प्रकारे भरून आल्या. अखेर ११ मे २०२६ रोजी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तो बाह्यरुग्ण विभागात नियमित फॉलो-अपसाठी येत असून कोणतीही औषधे सुरू नाहीत.
*डॉ. जंबगी म्हणाले,* लहान मुलांमधील भाजण्याच्या घटना केवळ शारीरिकच नव्हे तर कुटुंबासाठी मानसिकदृष्ट्याही अत्यंत वेदनादायी असतात. या प्रकरणातून तातडीची प्रथमोपचार मदत, विशेष बाल अतिदक्षता केंद्रात वेळेत पोहोचणे, संसर्ग नियंत्रण, योग्य पोषण आणि विविध वैद्यकशास्त्र तज्ज्ञांकडून विशेष उपचार मिळणे गरजेचे असते.
*बालकाच्या पालकांनी सांगितले,* आमच्या मुलाची अशी अवस्था पाहणे हा आमच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभव होता.सुरुवातीला तर आम्हाला तो वाचेल की नाही याची भीती वाटत होती. कार्डियाक अरेस्ट आणि गंभीररित्या भाजल्याने आम्ही खुप चिंतेत होतो. अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांनी अशा या कठीण प्रसंगी आम्हाला आधार दिला. आज आमच्या मुलाला पुन्हा पुर्वीसारखे हसताना आणि खाताना पाहणे हा आमच्यासाठी जणू एक चमत्कारच आहे. आमच्या मुलाला जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल आम्ही संपूर्ण वैद्यकीय टिमचे व ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांची आम्ही मनापासून आभार मानतो.
