
पुणे, दि. 20 जानेवारी 2026 :
पुण्यातील न्यूरोलॉजिकल सेवा जागतिक दर्जावर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे यांनी आज गिया -बारे सिंड्रोम (GBS) रुग्णांसाठी समर्पित व अत्याधुनिक GBS क्लिनिक आणि तात्काळ उपचार विभाग सुरू केल्याची घोषणा केली.या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून GBS रुग्णांचे लवकरात लवकर तज्ज्ञांच्या हस्ते अचूक निदान करून ६ ते ८ तासांच्या आत प्रभावी औषधी उपचार सुरू करण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते, या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.GBS रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या, प्रगत निदान सुविधा, समर्पित आयसीयू सपोर्ट तसेच न्यूरोलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, फिजिओथेरपिस्ट, रिहॅबिलिटेशन तज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग टीमची २४ तासांची समन्वयित सेवा या क्लिनिकमध्ये उपलब्ध असेल.
तसेच डिस्चार्जनंतर रुग्णांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी (रिहॅबिलिटेशन) आवश्यक असलेल्या सर्व सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.यावेळी माध्यमांशी बोलताना न्यूरोलॉजी विभागाचे संचालक डॉ. राजस देशपांडे म्हणाले,
“गिया -बारे सिंड्रोम हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारात शरीराच्या स्वतःच्या प्रतिकारशक्तीतील काही प्रथिने चुकून नसांवर हल्ला करतात. परिणामी नसांचे नुकसान होऊन हात-पायांमध्ये अचानक अशक्तपणा, पक्षाघात (पॅरालिसिस), चालण्यात अडचण तसेच चेहऱ्याच्या व गिळण्याच्या नसांवर परिणाम होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये श्वसनशक्ती कमकुवत झाल्यास व्हेंटिलेटरची गरजही भासू शकते.”ते पुढे म्हणाले,
“GBS मध्ये वेळेवर उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. योग्य वेळी उपचार सुरू झाल्यास पुढे होणारे घातक परिणाम टाळता येतात आणि रुग्ण पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. या विशेष क्लिनिकच्या माध्यमातून पुणे व परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी जागतिक दर्जाचे तात्काळ उपचार उपलब्ध होतील.”अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना डॉ. देशपांडे पुढे म्हणाले की,
“सामान्यतः रुग्णाला लक्षणे जाणवायला लागल्यापासून दवाखान्यात दाखल होणे, तपासण्या होणे, योग्य निदान होणे आणि उपचार सुरू होईपर्यंत २४ ते ४८ तासांचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी वाया जातो, ज्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते. अनेक वेळा तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे योग्य उपचार देणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन आम्ही या GBS क्लिनिकमध्ये असा विशिष्ट प्रोटोकॉल तयार केला आहे की रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर ४ ते ६ तासांत सर्व तपासण्या पूर्ण करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले जातील.”GBS च्या उपचारांबाबत माहिती देताना ते म्हणाले,
“GBS वर मुख्यतः दोन प्रकारे उपचार करता येतात—IVIG (इम्युनोग्लोब्युलिन) इंजेक्शनद्वारे किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज (डायलिसिससदृश प्रक्रिया) पद्धतीने. सर्वसाधारणपणे हे उपचार अत्यंत खर्चिक असतात; मात्र या क्लिनिकच्या अंतर्गत आम्ही विशेष सवलती उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबांनाही हे उपचार परवडू शकतील.”यावेळी ज्युपिटर हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी कन्सल्टंट डॉ. शिवराज हुंगे म्हणाले,
“GBS क्लिनिक हे केवळ न्यूरोलॉजी विभागापुरते मर्यादित नसून, या संपूर्ण उपचार प्रक्रियेत कार्डिओलॉजिस्ट, पल्मोनोलॉजिस्ट तसेच इंटेन्सिव्हिस्ट यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या सर्व तज्ज्ञांच्या एकत्रित उपचार पद्धतीमुळे रुग्णावर कमी वेळेत योग्य उपचार करणे आणि सातत्यपूर्ण देखरेख ठेवणे शक्य होते.”ते पुढे म्हणाले,
“इम्युनोथेरपी किंवा IVIG उपचारांनंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. मात्र व्हेंटिलेटर काढल्यानंतर स्पीच थेरपी, फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनच्या मदतीने रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतो. ज्युपिटर हॉस्पिटलच्या GBS क्लिनिकमध्ये हे सर्व उपचार आवश्यक त्या सर्व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.”ज्युपिटर हॉस्पिटल, पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी या विशेष GBS क्लिनिकमागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले,
“जलद निर्णय प्रक्रिया, विविध विभागांमधील अचूक समन्वय आणि सर्व प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करून रुग्णाला त्वरित उपचार देणे अत्यावश्यक आहे. या समर्पित GBS क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही हा समन्वय अधिक प्रभावीपणे साधून अधिकाधिक रुग्णांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करू.”या समर्पित GBS क्लिनिकला GBS-तत्पर आयसीयू, प्रगत निदान सेवा, मल्टीडिसिप्लिनरी क्रिटिकल केअर आणि व्यापक पुनर्वसन सुविधांचे सशक्त पाठबळ लाभले आहे. तसेच हे केंद्र रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आजाराची लक्षणे ओळखण्याबाबत जागरूक करण्यावरही भर देते, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप शक्य होतो. प्रत्येक रुग्णासाठी दीर्घकालीन देखभाल योजना आणि मानसिक आधार सुनिश्चित करण्यात येतो.या उपक्रमाद्वारे ज्युपिटर हॉस्पिटल सहजप्राप्य, रुग्णकेंद्रित आणि उच्च दर्जाच्या न्यूरोलॉजिकल देखभालीप्रती आपली वचनबद्धता अधोरेखित करते. या क्लिनिकचे उद्घाटन हे विशेष पायाभूत सुविधा, क्लिनिकल नैपुण्य आणि एकात्मिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून जटिल न्यूरोलॉजिकल विकारांवर प्रभावी उपचार करण्याच्या दिशेने पुणे व महाराष्ट्रातील रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
