
पुणे (प्रतिनिधी) : उदयोन्मुख कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांना आपली कलात्मक प्रतिभा सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा सातवा अलिबाग लघुपट महोत्सव येत्या ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध देशांतील शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन होणार असून, चित्रपट क्षेत्रातील कलाकार आणि तंत्रज्ञांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सारसबागजवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या सभागृहात होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विविध देशांतील लघुपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक योगेश बारस्कर यांनी दिली.
महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या लघुपटांच्या आधारे सर्वोत्कृष्ट लघुपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह एकूण ३२ विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ लेखक आणि संगीत समीक्षक सुभाषचंद्र जाधव यांच्या हस्ते विविध श्रेणींतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जाणार असून, पुरस्कार वितरण सोहळा त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. यावेळी प्रदर्शित लघुपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना प्रशंसापत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या महोत्सवात सहभागी होणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबत संवादात्मक सत्रे व चर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नवोदितांना चित्रपट निर्मितीतील अनुभव, तांत्रिक बाबी आणि सर्जनशील प्रक्रियेविषयी थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
नवोदित कलावंतांना प्रोत्साहन देणारा आणि लघुपटांच्या माध्यमातून विविध विषयांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
