• ‘कला कृषी बाजार’ आणि ‘भारत ग्राम उत्सव’मध्ये २० हून अधिक राज्यांतील १५० हून अधिक संस्था आणि ३,००० हून अधिक उत्पादने.
• पाच दिवसीय प्रदर्शन क्रिएटिसिटी मॉल, पुणे येथे आयोजित.
• दिनांक: १ ते ५ ऑक्टोबर २०२६
• वेळ: सकाळी ११ ते रात्री ९
• प्रवेश विनामूल्य | पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध

पुणे, १ ऑक्टोबर २०२६: इशान्या फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम असलेला ‘यलो रिबन एनजीओ फेअर’ आपल्या १९व्या विशेष आवृत्तीत एका नव्या स्वरूपात ‘कला कृषी बाजार – द कॉन्शस लाइफस्टाइल बाजार’ या नावाने पुन्हा एकदा पुण्यात येत आहे. इशान्या फाउंडेशनतर्फे नाबार्डच्या ‘भारत ग्राम उत्सव’च्या सहकार्याने आयोजित हा पाच दिवसीय महोत्सव १ ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत क्रिएटिसिटी मॉल, पुणे येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाला सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असून, वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध असेल.
जगभरातील अनेकांना भारताच्या समृद्ध हस्तकलेतून प्रेरणा मिळते; मात्र या कलाकृतींचे खरे मानकरी त्या कारागिरांचे हात आणि हृदय आहेत, ज्यांनी पिढ्यान्पिढ्या या परंपरा जिवंत ठेवल्या आहेत. आता या अस्सल कलावंतांचा आणि त्यांच्या कलेचा गौरव करण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांपासून ते पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या पारंपरिक हस्तकलांपर्यंत, भारतीय कारागिरांनी जगभरात प्रशंसा मिळविणाऱ्या अनेक कलाकृती आणि परंपरा निर्माण केल्या आहेत. ‘कला कृषी बाजार’ या कलाकृती ग्राहकांच्या अधिक जवळ आणतो आणि कारागिरांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्या कलेमागील कथा जाणून घेण्याची तसेच स्थानिक हस्तकला, ग्रामीण उद्योजकता आणि भारतीय प्रतिभेला पाठबळ देण्याची संधी उपलब्ध करून देतो.
या प्रदर्शनात २० हून अधिक राज्यांतील १५० हून अधिक कारागीर, हस्तकलाकार आणि ३,००० हून अधिक उत्पादने सहभागी होणार आहेत. पारंपरिक हस्तकला, हातमागावरील वस्त्रे, सेंद्रिय उत्पादने, पर्यावरणपूरक वस्तू आणि विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ यांचा अनुभव घेण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. तसेच, या उत्पादनांमागील कारागीर, उत्पादक आणि समुदायांशी थेट संवाद साधता येणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या खरेदीपर्यंत, गृहसजावटीच्या वस्तूंपासून ते कॉर्पोरेट भेटवस्तूंपर्यंत विविध प्रकारची उत्पादने या बाजारात उपलब्ध असतील. कारागीर, हस्तकलाकार आणि ग्राहक यांना एकत्र आणून, त्यांच्या कौशल्याला, उत्पादनांना आणि अनुभवांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ‘कला कृषी बाजार’चा उद्देश आहे.
१९व्या आवृत्तीविषयी बोलताना इशान्या फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती पारुल मेहता म्हणाल्या, “यलो रिबन एनजीओ फेअरचा ‘कला कृषी बाजार’ हा एक सुंदर नवा अध्याय आहे. या उपक्रमामागील मूळ उद्देश मात्र कायम आहे. या आवृत्तीत देशभरातील निवडक कारागीर, शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उद्योजक एकत्र येत आहेत. त्यांच्या कामाची ओळख करून घेण्यासाठी, त्यांच्या कथा जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या उपजीविकेला पाठबळ देण्यासाठी हे एक व्यासपीठ ठरेल. प्रत्येक खरेदी ही विचारपूर्वक केलेली निवड करण्याची, तसेच भारताच्या समृद्ध परंपरा आणि हस्तकलेचा गौरव करण्याची संधी आहे.”
नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर म्हणाले, “ग्रामीण भारतातील विविधता, हस्तकौशल्य आणि उद्योजकता प्रदर्शित करण्यासाठी तसेच उत्पादकांना व्यापक ग्राहकवर्गाशी जोडण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देतो. ‘कला कृषी बाजार’सोबतचे आमचे सहकार्य म्हणजे ग्रामीण उत्पादक आणि कारागिरांची उत्पादने व त्यांच्या कथा शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी आहे. यामुळे ग्रामीण उत्पादक आणि कारागिरांच्या कार्याविषयी अधिक आदर निर्माण होईल आणि त्यांच्यासाठी बाजारपेठेच्या नव्या संधी उपलब्ध होतील.”
‘कला कृषी बाजार’मध्ये भारतातील हस्तकला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविधतेचे दर्शन घडविणाऱ्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन असेल. यामध्ये हाताने तयार केलेली वस्त्रे, पारंपरिक विणकाम, मातीची भांडी, गृहसजावटीच्या वस्तू, सेंद्रिय उत्पादने, नैसर्गिक आरोग्यवर्धक उत्पादने तसेच पुनर्वापर आणि पुनर्चक्रणातून तयार केलेल्या वस्तूंचा समावेश असेल. अभ्यागतांना साड्या, स्टोल्स, शाली, पिशव्या, टोपल्या, चित्रकला, कलावस्तू आणि सणासुदीच्या भेटवस्तूंसह ए२ तूप, मध, गूळ, मसाले, भरडधान्ये, शेतातील ताज्या भाज्या, लोणची आणि चटपटीत खाद्यपदार्थ अशा विविध उत्पादनांची खरेदी करता येईल. या उत्पादनांमधून गुणवत्ता आणि किफायतशीरपणाचा अनुभव घेता येईल.
प्रदर्शनात पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद देणारे खास फूड कोर्टही असेल. येथे पुरणपोळी, थालीपीठ, पिठलं-भाकरी आणि भरडधान्यांपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आनंद घेता येईल. प्रदर्शनातील उत्पादने आणि हस्तकलेसोबतच विविध प्रांतांतील अस्सल खाद्यसंस्कृतीचा अनुभवही अभ्यागतांना घेता येईल. लहान मुलांसाठी थेट कार्यशाळा, ट्रॅम्पोलिन पार्क, पिकलबॉल आणि पॅडल यांसारखी आकर्षणे असतील. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आनंददायी दिवस घालविण्याची संधी मिळेल. तसेच, डोके आणि पायांची आरामदायी मालिश, मेहंदी आणि इतर सुविधांद्वारे विश्रांती व ताजेतवाने होण्याचाही अनुभव घेता येईल.
पाच दिवसांच्या या प्रदर्शनादरम्यान अभ्यागतांना कारागीर आणि हस्तकलाकारांशी थेट संवाद साधता येईल. विणकाम, सेंद्रिय शेती, शाश्वत हस्तकला, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण यांसारख्या पारंपरिक तंत्रांविषयी आणि प्रक्रियांविषयी जाणून घेता येईल. विविध सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था, स्वयंसहायता गट आणि सामाजिक उद्योजकांच्या कार्याचीही या प्रदर्शनातून ओळख होईल.
केवळ खरेदी-विक्रीचे व्यासपीठ न राहता, ‘कला कृषी बाजार’चा उद्देश समुदाय आणि ग्राहक यांच्यात अर्थपूर्ण नाते निर्माण करणे तसेच सहभागी संस्थांच्या उपजीविका आणि सामाजिक कार्यांना अधिक व्यापक प्रसिद्धी मिळवून देणे हा आहे. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या संस्था महिला सक्षमीकरण आणि उपजीविका, मानसिक आरोग्य, कारागीर व विणकरांचे सक्षमीकरण, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण विकास, युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकास, पुनर्वापर आणि पुनर्चक्रण, आरोग्य, शिक्षण तसेच दिव्यांग व्यक्ती आणि अध्ययनविषयक विशेष गरजा असलेल्या व्यक्तींच्या समावेशनासाठी कार्यरत आहेत.
नाबार्डच्या ‘भारत ग्राम उत्सव’सोबतचे सहकार्य ग्रामीण उत्पादक आणि उद्योजकांना अधिक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देईल. देशभरातील विविध समुदायांची उत्पादने आणि त्यांच्या कथा जाणून घेण्याची संधी यामुळे शहरी ग्राहकांना मिळणार आहे.
इशान्या फाउंडेशनविषयी
इशान्या फाउंडेशन कौशल्य विकास, उपजीविकेसाठी सहाय्य आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून समुदायांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. ‘यलो रिबन एनजीओ फेअर’ हा फाउंडेशनचा प्रमुख उपक्रम असून, सामाजिक संस्था, कारागीर आणि हस्तकलाकारांना सामाजिक बांधिलकी, संस्कृती आणि सामुदायिक सहभागाचा उत्सव साजरा करणारे व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
