*’सौर संवाद २०२६’ यात्रेचे अहिल्यानगर येथे उद्घाटन*-*सौर ऊर्जेच्या वापरात महाराष्ट्र प्रगतीपथावर: गोपाल काबरा*

– सौर ऊर्जा प्रसारासाठी गोपाल काबरा फाऊंडेशन व जीके एनर्जी यांचा संयुक्त उपक्रम

पुणे : सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही यात्रा १४ जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचा शुभारंभ सोमवारी (दि. १२) अहिल्यानगर येथून झाला व त्यानंतर ही यात्रा संभाजीनगर येथे पोहोचली. महाराष्ट्रातील १४ शहरांमधून जाणारी ही यात्रा मंगळवारी (ता. १३) नाशिक आणि धुळे येथे, १४ ऑक्टोबरला बुलढाणा व अमरावती येथे, १५ ऑक्टोबरला भंडारा व चंद्रपूर येथे, १६ ऑक्टोबरला वाशीम, नांदेड, लातूर येथे, १७ ऑक्टोबरला सोलापूर आणि कोल्हापूर येथे सौर ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिकांशी संवाद साधणार आहे. पुणे येथे १८ ऑक्टोबरला या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेद्वारे राज्यातील ३४ जिल्ह्यांतील इच्छुक उद्योजकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

उद्घाटनप्रसंगी जीके एनर्जीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गोपाल काबरा म्हणाले, “सौर ऊर्जेचा वापर केवळ वीज निर्मितीपुरता मर्यादित न ठेवता त्यातून स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेदरम्यान विशेषतः युवक आणि महिलांना सौर ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींची माहिती देऊन त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. एक हजारांहून अधिक इच्छुक उद्योजकांना सक्षम करण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जेच्या वापरासाठी केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अनेक प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात या यात्रेची मदत होणार आहे.” सौर ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीपथावर असून, भारतात दुसऱ्या स्थानी असल्याचेही काबरा यांनी नमूद केले.

घरगुती छतावरील (रुफटॉप) सौर यंत्रणा, व्यावसायिक सौर प्रकल्प, सौर कृषिपंप, ऊर्जा साठवण, यंत्रणा बसविणे, देखभाल आणि वितरण अशा विविध क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात येत आहे. तसेच विक्री, सेवा आणि तांत्रिक कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन केले जाईल. सौर ऊर्जेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर उद्योजकांचे जाळे निर्माण करून स्थानिक रोजगार वाढविणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा प्रसार वेगाने करणे, हा या यात्रेमागील व्यापक दृष्टिकोन आहे. या क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचवून त्यांना शाश्वत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यावरही भर दिला जाणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button