योगेश माळी यांना १५ दिवस साधा कारावास :
१०,५०० दंड न भरल्याने थेट कारागृहात रवानगी

पुणे (प्रतिनिधी):-
दारू पिऊन वाहन चालविण्याच्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. मोटार वाहन न्यायालय, पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.पाटील यांनी फिर्याद खटला नंबर १६८८७५/२०२५ या प्रकरणात आरोपी योगेश देवीदास माळी यास दिनांक ०२ मार्च २०२६ रोजी दोषी ठरवून कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आरोपीस मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालविणे) अन्वये १५ दिवस साधा कारावास व ₹१० हजार द्रव्यदंड ठोठावण्यात आला आहे. सदर दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास अशी अतिरिक्त शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कलम १३०(१)/१७७ अन्वये केलेल्या अपराधासाठी आरोपीस ₹५००/- द्रव्यदंड व तो न भरल्यास ०१ दिवस साधी कैद, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयात एकूण रूपये १० हजार ५०० इतकी दंड रक्कम आरोपीने भरली नसल्याने, सपुर्दगी वॉरंट काढण्यात येऊन आरोपीस येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्याय निर्णयाची प्रत आरोपीस विनामूल्य देण्यात आली असून निर्णय खुल्या न्यायालयात जाहीर करण्यात आला.
दरम्यान, हिंजवडी वाहतूक विभागातर्फे दिनांक १ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत दारू पिऊन वाहन चालविण्याच्या ४३ प्रकरणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाढती मद्यधुंद वाहनचालकांची संख्या लक्षात घेता, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
