सरूडच्या सुपुत्राचा इतिहास संशोधनात राष्ट्रीय स्तरावर डंका!

प्रा.सुहास नाईक यांच्या ‘फंगल इन्फेक्शन डिटेक्टिंग स्कॅनर’ला पेटंट :
ऐतिहासिक वारशाला तंत्रज्ञानाचे कवच, जुन्या कागदपत्रांच्या संरक्षण

शाहूवाडी (प्रतिनिधी):-
इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाची नोंद नव्हे, तर ती एका राष्ट्राची स्मृती आहे. ती स्मृती जपण्याचे काम ज्या कागदांवर, हस्तलिखितांवर आणि अभिलेखांवर झाले, त्यांचे संरक्षण आज सर्वात मोठे आव्हान बनले आहे. या आव्हानाला उत्तर म्हणून शाहूवाडी तालुक्यातील मौजे.सरूड येथील युवा इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक यांच्या संशोधन चमूला ‘फंगल इन्फेक्शन डिटेक्टिंग स्कॅनर’ या अभिनव उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. त्यामुळे पुराभिलेखागार, ग्रंथालये, संग्रहालये आणि संशोधन संस्थांमध्ये जतन केलेल्या लाखो दुर्मिळ कागदपत्रांना बुरशी, आर्द्रता आणि कीटकांपासून वाचवण्यासाठी हे तंत्रज्ञान संजीवनी ठरणार आहे. परिणामी सरूडचे सुपुत्र प्रा.सुहास नाईक यांच्या ऐतिहासिक संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाल्यामुळे शाहूवाडी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या संशोधनात सातारा येथील डॉ.अनिल जगताप, रायमत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ.राजेंद्र मोरे, लातूरचे प्रा.नंदकुमार साळुंखे आणि सरूडचे इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. चार तज्ज्ञांच्या सामूहिक विचारातून जन्माला आले हे उपकरण केवळ शोध नसून, वारसा जपण्याची नवी दृष्टी आहे. आजवर जुन्या नोंदी, राजपत्रे, वतनपत्रे, सामाजिक-सांस्कृतिक दस्तऐवजांचे नुकसान झाल्यावरच त्याची दखल घेतली जात होती. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर उपाय ही पद्धत बदलून नुकसान होण्यापूर्वीच प्रतिबंध हे सूत्र या स्कॅनरने मांडले आहे. त्यामुळेच याला तंत्रज्ञान कवच म्हटले जात आहे.

महाराष्ट्रासारख्या दमट हवामानाच्या राज्यात ऐतिहासिक कागदपत्रांचे आयुष्य कमी होते. त्यामुळे कोल्हापूर, सातारा, लातूर भागातील वाडे, देवस्थान आणि खाजगी संग्रहातील हजारो दस्तऐवज धोक्यात आहेत. अशा वेळी हे पोर्टेबल स्कॅनर गावागावातील संग्रहांपर्यंत पोहोचू शकते, हीच या पेटंटची मोठी ताकद आहे. परिणामी, केवळ सरकारी अभिलेखागारच नव्हे, तर घराघरातील जुनी पत्रे, वंशावळी, जमीनदस्तऐवज, कुंटुंबाचे छायाचित्रे यांचे संरक्षणही यामुळे शक्य होणार आहे. तंत्रज्ञान लोकाभिमुख होण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे संशोधन विज्ञान आणि इतिहास या संगमाचे प्रतिक आहे. इतिहासाला प्रयोगशाळेत नेण्याची आणि तंत्रज्ञानाला मातीशी जोडण्याची जी दृष्टी यातून दिसते, तीच खरी प्रगती आहे. शिवाय या पेटंटमुळे भारतीय ऐतिहासिक वारशाला जागतिक दर्जाची तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. तसेच युनेस्कोच्या वारसा दस्तऐवजीकरणाच्या निकषांशी सुसंगत असले हे उपकरण मेक इन इंडियाच्या संकल्पनेलाही बळ देणारे आहे.

या ऐतिहासिक संशोधनाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे सहकार. चार वेगवेगळ्या संस्थांचे, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येऊन एका सामाजिक प्रश्नावर उत्तर शोधतात, हीच खरी शैक्षणिक संस्कृती आहे. स्पर्धेऐवजी सहकारावर भर देणारे हे मॉडेल इतर संशोधकांसाठी आदर्श आहे. विशेष म्हणजे हे यश महानगरातील मोठ्या प्रयोगशाळेत नव्हे, तर कोल्हापूर शाहूवाडी तालुक्यातील सरूड सारख्या छोट्याशा गावपातळीवरून आले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील तरुण संशोधकांचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. त्यामुळे भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील सर्व तालुका ग्रंथालये, सहकारी संस्थांचे रेकॉर्ड रूम, मंदिरांचे दस्तऐवज विभाग डिजिटल आणि सुरक्षित करता येतील. ही केवळ कल्पना नसून, युवा इतिहास संशोधक प्रा.सुहास नाईक यांच्या चमूची पुढची योजना आहे.

याविषयी बोलताना प्रा.सुहास नाईक म्हणाले की, पुरातन कागदपत्रे ही काळाची साक्ष आहेत. त्यांना वाळवी, बुरशी आणि आर्द्रतेपासून वाचवणे म्हणजे आपल्या मुळांशी जोडले राहणे. हे उपकरण प्राथमिक स्तरावरच धोका ओळखून संशोधक आणि अभिलेखापालांना सतर्क करते. तर डॉ.अनिल जगताप म्हणाले की, या पेटंटच्या निमित्ताने राज्य सरकार, विद्यापीठे आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. कारण वारसा जपणे ही केवळ संशोधकांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तसेच डॉ.राजेंद्र मोरे म्हणाले की, ऐतिहासिक दस्तऐवज हे केवळ कागद नसतात, ते आपल्या पूर्वजांचे श्वास असतात. त्या श्वासाला तंत्रज्ञानाचे कवच देण्याचे काम प्रा.सुहास नाईक आणि आम्ही सर्व सहकाऱ्यांनी केले आहे. तर एखादा दस्तऐवज नष्ट झाला की, एका पिढीचा आवाज कायमचा हरवतो. तंत्रज्ञानाने तो आवाज जिवंत ठेवणे शक्य आहे, हे आम्ही सिद्ध केले असल्याचे प्रा.नंदकुमार साळुंखे यांनी आवर्जून सांगितले.

दरम्यान प्रा.सुहास नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनिअप्पा, माजी केंद्रीय मंत्री नारायणस्वामी, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, माजी गृहमंत्री रमेश बागवे, वसंतदादा साळवे, म्हैसूर विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा‌.डॉ.एन.सदाशिवन, नगरसेवक सुभाष जगताप, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आर्टीचे महासंचालक सुनील वारे, प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, डॉ.श्रीमंत कोकाटे, प्रा.सोमनाथ कदम, सुदर्शन चखाले, अरविंद पाटोळे, मुक्ता कदम, अशोक उफाडे, प्रा.शरद गायकवाड, शाहिर महादेव खंडागळे, लेखक राजू बाविस्कर, प्रा.प्रकाश नाईक, धम्मसंगिनी रमा गोरख, अंकल सोनवणे, प्रा.अनिल लोखंडे, डॉ.प्रेम हनवते, सचिन बगाडे, प्रियंका खरात, डॉ.स​तीश नाईक, निलेश वाघमारे, अशोक लोखंडे, कवी गणेश भालेराव, सिध्देश्वर जाधव, विनोद शिंदे, अमोल खंडाळे, नागेश गायकवाड, सुनील पारवे यांच्यासह राज्यभरातील संशोधक, अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

चौकट क्रमांक १

तंत्रज्ञानाचा सामाजिक उपयोग…

शैक्षणिक संस्था : जुन्या प्रवेशनोंदी, निकालपत्रे, मान्यतापत्रे सुरक्षित.
धार्मिक संस्था: देवस्थानांचे इनामपत्रे, देणगीनोंदी जतन.
सहकारी क्षेत्र : साखर कारखाने, पतसंस्थांच्या ऐतिहासिक नोंदींचे संरक्षण.

चौकट २

फंगल इन्फेक्शन डिटेक्टिंग स्कॅनरचे वैशिष्ट्य

कार्य: कागदावरील बुरशीचे संक्रमण, आर्द्रतेचे प्रमाण व क्षयाची लक्षणे ओळखणे.
उपयोग: हस्तलिखिते, ग्रंथ, नोंदवह्या, फोटो, नकाशे यांची नियमित तपासणी.
फायदा: नुकसान होण्यापूर्वीच उपाययोजना शक्य, खर्च आणि वेळेची बचत.

महाराष्ट्र रिपोर्टर बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button