
पुणे प्रतिनिधी :
समाजसेवा ही केवळ मदत नसून ती माणुसकीची खरी ओळख असते. महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रमांद्वारे गरजूंना आधार देणाऱ्या डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील कार्याची प्रचिती दिली आहे.



जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट™ व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अशोका हॉल, शिवाजीनगर न्यायालय परिसर, पुणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “प्रदूषण टाळा, जग वाचवा, भविष्य वाचवा” हा सामाजिक संदेश देत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
*मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्री. ए. टी. वानखेडे* यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी *श्री. एस. एस. कंठाळे (जिल्हा न्यायाधीश-१ व सत्र न्यायाधीश, पुणे),*
*सौ. रेवती देशपांडे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण)*
तसेच *डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. संकेत शहा* यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण ठरला तो नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या गरजू मुलींना सायकली भेट देण्याचा. अनेक मुलींसाठी ही सायकल केवळ वाहन नव्हती, तर त्यांच्या शिक्षणाच्या आणि स्वप्नांच्या प्रवासाला मिळालेली नवी दिशा होती. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यांतील आत्मविश्वास उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.
याच कार्यक्रमात संपूर्ण भारतभर ११,००० किलोमीटरहून अधिक सायकल प्रवास करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे सायकलपटू श्री. उत्तम धोका यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्यातून युवकांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश यामागे होता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत असलेला डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट आज अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देत मानवतेची सेवा हेच आपले कर्तव्य मानणारी ही संस्था हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून गेला.
या प्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, वकील वर्ग, समाजसेवक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सायकल चालवा, आरोग्य जपा; प्रदूषण कमी करा, भविष्य सुरक्षित करा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
